इतिहासाचा संदर्भ घेऊन पर्यावरणाच्या माध्यमातून युवा वर्गाला विधायक दिशा देण्याचा प्रयत्न... सावली केअर सेंटर गेल्या 20 वर्षांपासून परावलंबित्व आलेल्या रुग्णांच्या सेवाकार्यात कार्यरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या आरोग्याच्या व्याख्येमध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याचा समावेश केला आहे. शारीरिक व मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सावली केअर सेंटर गेली अनेक वर्ष काम करतच आहे. आता सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने ‘सावली सोशल सर्कल’ च्या माध्यमातून काही उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत.

वारसा शिव विचारांचा

Shivaji main
shivaji-maharaj Abhishek
पार्श्वभुमी:

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या छ. शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून मिरवणारी आजची तरुण पिढी खरचं ‘मावळा’ या शब्दाला जागणारी आहे का? नुसती महाराजांप्रमाणे दाढी वाढवून आणि शिवजयंती वा तत्सम उत्सवांना गाडीचे सायलेन्सर काढून भरधाव गाड्या हाकणे, प्रदुषण वाढवणे, जोरजोरात घोषणा देऊन डि.जे. च्या तालावर मिरवणूका काढणे याने खरचं शिवप्रेम व्यक्त होते का? तरुणाईमध्ये असलेला हा उन्माद बंद करुन त्यांचे शिवप्रेम विधायक दिशेला वळवणे गरजेचे आहे.
एकंदरीत 3 पद्धतीने शिवजयंती उत्सवाला विधायक वळण देण्याचा मानस आहे.

1) शिवचाफा महोत्सव
ऐतिहासिक पार्श्वभुमी:

कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळगड जिंकल्यानंतर येणार्‍या गुढीपाडव्याला छ. शिवाजी महाराजांनी पन्हाळगडवर असलेल्या सोमेश्वर महादेवाला सव्वा लाख चाफ्यांनी अभिषेक केला होता. याचाच अर्थ तेंव्हा गडाच्या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात चाफा उपलब्ध होता. आज मात्र अत्यंत तुरळक प्रमाणातच चाफ्याची झाडे दिसून येतात.

सन 2025 मध्ये शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला 351 वर्ष पुर्ण होत आहेत. या वर्षाचे औचित्य साधून त्यावर्षीच्या गुढीपाडव्यापासून दरवर्षी पन्हाळगडाच्या सोमेश्वर महादेव मंदिरात पुन्हा एकदा सव्वा लाख चाफ्याच्या फुलांनी अभिषेक करण्याचा संस्थेचा मानस आहे.
त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये शिवस्पर्श झालेल्या एका ठिकाणी हा शिवचाफा महोत्सव करुन त्यायोगाने त्या त्या तालुक्यातील तरुणाई, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एकंदरीत सर्वच शिवप्रेमी विधायक कार्यासाठी एकत्र येतील.
यासाठी किमान 50 हजार चाफ्यांच्या झाडांची आवश्यकता भासेल. लागवड केल्यानंतर झाडे जगण्याचा दर लक्षात घेता 30 हजार झाडे जगतील असा अंदाज आहे.

उपक्रमाची कार्यपद्धती :

1) संस्थेच्या स्वत:च्या नर्सरीज बरोबर, अन्य सामाजिक भावनेतून चालवल्या जाणार्‍या खाजगी नर्सरीज, सामाजिक वनीकरण, वनखाते, स्थानिक स्वराज्य संस्थांचे उद्यान विभाग, शासकिय आणि खाजगी नर्सरीज यांच्या मदतीने 50,000 सोनचाफ्याची झाडे उपलब्ध करणे.
2) जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, अ‍ॅकॅडमीज, शासकिय/निमशासकिय/खाजगी कार्यालये, उद्योजक, कारखानदार, व्यापारीबंधू याचबरोबर सर्व नागरीक यांच्या सहकार्याने या रोपांची लागवड आणि संगोपन करणे.
यामध्ये मुख्यत्वे सरसकट वृक्षारोपण न करता प्रत्येक नागरीक वा इच्छुक संस्थेला ते पुर्णवेळ संगोपन करु शकतील इतकेच वृक्ष त्यांच्या स्वत:च्या आवारात लावण्यास देण्यात येतील. यामूळे लावलेल्या वृक्षांचे संगोपन व्यवस्थितरित्या होण्याची शक्यता वाढेल.
3) महाराजांच्या राज्यारोहणाच्या 351व्या वर्धापनदिनी या उपक्रमाची सुरवात करुन इच्छुकांना चाफ्याच्या झाडांचे वितरण सुरु करणे. सन 2030 साली महाराजांच्या 400 व्या जयंतीला प्रत्यक्ष अभिषेकाला सुरवात करणे.
4) कोल्हापूरच्या 12 तालुक्यांत शिवपदस्पर्श झालेल्या निवडक ठिकाणी अभिषेकाला सुरवात म्हणजे त्या त्या तालुक्यातील युवावर्गाला विधायक उपक्रमात गुंतवता येईल.

2) शिवचरित्र पठण:

शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील निवडक प्रसंगच अनेकांना माहित आहेत. संपुर्ण शिवाजी महाराजांचे चरित्र तरुणाईला माहित झाल्यास त्यांच्यात सकारात्मक बदल होण्यास निश्चित मदत होईल असा विश्वास वाटतो.
शिवजयंतीच्या आठ दिवस आधी शिवचरित्राचा अभ्यास/पठण सुरु करणे. मंडळाला आवडेल ते शिवचरित्राचे पठण करता येईल. हे अभिवाचन, ऑडिओ बुक अशा अनेक माध्यमांतून करता येईल. मात्र मंडळांच्या सर्व सदस्यांना ते श्रवण करण्यासाठी उद्युक्त करावे लागेल.
हे पठण झाल्यानंतर त्याच्या आधारावर प्रश्नमंजुषा/नाटिका /वक्तृत्व / निबंध अशा स्पर्धा आयोजित करता येतील. त्यातील विजेत्यांना योग्य ते बक्षिसही देता येईल.

3) व्याख्याने:

जगभरातील अनेक तज्ञ शिवाजी महाराजांच्या विविध गुणांचा अभ्यास करुन यश मिळवत आहेत. आपल्या तरुणाईला त्यांच्या व्यवस्थापन कौशल्य, युद्ध कौशल्य, राजनिती, अर्थशास्त्र, पर्यावरणीय दृष्टीकोन, स्थापत्य शास्त्र अशा अनेक विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात येतील जेणेकरुन युवावर्गाला शिवाजी महाराज खर्‍या अर्थाने कळतील. त्यातून तरुणांना त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देता येईल

उपक्रमाद्वारे अपेक्षित फायदे

1) शिवाजी महाराज खर्‍या अर्थाने कळल्यामूळे शिवजयंतीच्या नावाखाली चालू असणारी दंडेली कमी होण्यास मदत होईल.

2) शिवप्रेम या भावनेचा वापर करुन वृक्षप्रेम वाढवून त्या आधारे पर्यावरण क्षेत्रात भरीव काम करता येईल. याद्वारे शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात नमूद केलेल्या सर्व वृक्षांची लागवड करणे अशासारख्या अनेक विधायक कामांची सुरवात करता येईल.

3) समाजातील शिवप्रेमाची भावना विधायककरित्या वाढवण्याची वृत्ती वाढीस लागेल.

4) सामाजिक तेढ वाढवणार्‍या विध्वसंक वृत्तींना पायबंद बसेल.

या उपक्रमामध्ये कोल्हापूरमधील कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, मनोबल व्यसनमुक्ती केंद्र, जायंटस् ग्रुप ऑफ कोल्हापूर पर्ल, कलानिकेतन, स्मॅक, गोशिमा, विवेक फौंडेशन, नेस्टी सोशल फौंडेशन, वृक्षप्रेमी संघटना, देवराई, वनिता समाज, सार्थक फौंडेशन, करवीर साहित्य सभा, हृदयस्पर्श, माया केअर फौंडेशन, मुख्याध्यापक संघ, थुंकीमुक्त कोल्हापूर अभियान, आत्मसहाय्य सामाजिक संस्था या संस्था सक्रिय सहभागी असणार आहेत.

या उपक्रमाची सुरवात आम्ही दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी संध्या. 5 वाजता कोल्हापूर मेडिकल असोयिएशन हॉल, जयप्रभा स्टुडिओ समोर, मंगळवार पेठ कोल्हापूर येथे करत आहोत.
प्रकल्पाची विचारप्रणाली

चाफा महोत्सव हा पुर्णपणे अराजकिय कार्यक्रम असेल.

कार्यक्रमाचा उद्देश

छ. शिवाजी महाराजांचे कार्य फक्त एका दिवसापुरते मर्यादित न राहता त्याची महती, कार्यपद्धती, विचारधारा अशा अनेक पैलूंचे दर्शन सातत्याने समाजासमोर यावे आणि कृतीमध्ये सुयोग्य बदल होऊन छत्रपतींना अपेक्षित असलेले स्वराज्य निर्माण व्हावे.

महाराजांचे स्मरण फक्त त्यांच्या प्रतिमा/मुर्तीपुजनात न अडकता महाराजांवर असलेल्या प्रेमाला योग्य दिशा दिली असता समाजातील ही उर्जा सकारात्मकरित्या काही भव्य घडवू शकेल असा संस्थेचा ठाम विश्वास आहे.

हा कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी कोणीही स्वत:ला इतिहास या विषयातील तज्ञ/जाणकार समजत नाही. तसा त्यांचा कधीच दावा असणार नाही. शिवाजी महाराजांच्या उपलब्ध असलेल्या अनेक शिवचरित्रांपैकी कोणत्याही शिवचरित्राचा ही संस्था पुरस्कार वा प्रतिकार करत नाही. सर्व शिवचरित्र संस्थेला वंदनीयच आहेत. त्यात मांडलेली तथ्ये, घटना यांची सत्यासत्यता फडताळण्याची संस्थेकडे यंत्रणा नाही. आणि तो संस्थेचा उद्देशही नाही.

केवळ शिवाजी महाराजांमध्ये असलेले गुण समाजातील युवा वर्गामध्ये पोहोचावेत, त्यांनी त्या गुणांचा आदर्श घेऊन त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा तसेच त्यानिमित्ताने संतूलीत पर्यावरणाच्या कार्यालाही थोडा हातभार लागावा असा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

शिवचाफा महोत्सव

चाफा झाडाकरिता नोंदणी

बटणावर क्लिक करा